स्वत:ची किंमत ओळखा!

Image Source : Google


श्रद्धा साड्यांच्या दुकानात गेली होती. तिच्या नणंदेच्या लग्नाचा जत्था काढण्यासाठी श्रद्धाच्या लग्नाला नुकतं कुठं वर्ष झालं होतं. सगळा जत्था काढून झाल्यावर श्रद्धाने नवरोबाकडे स्वतःसाठी एका साडीचा हट्ट धरला. तो ही म्हणाला घे तुला हवी ती साडी. श्रद्धाने स्वतःसाठी दोन साड्या पसंत केल्या. काऊंटरवर जेव्हा या दोन साड्यांचे बिल करायची वेळ आली तेव्हा श्रद्धाने त्यातील कमी किमतीची साडी घेतली आणि जास्त किमतीची साडी तिने दुकानातच सोडून दिली. श्रद्धा अशी का वागली असेल? इतकी महाग साडी तुझ्यासाठी कशाला? वगैरे टोमणे तिला कुणीही ऐकवले नव्हते तरीही तिने स्वतःहूनच हा निर्णय घेतला. 



कारण, तिने नेहमी हेच पहिले की, जेव्हा केव्हा तिची आई स्वतःसाठी काही खरेदी कारे तेव्हा ते कमीतकमी बजेटमध्ये कसे बसेल याचाच विचार करत असे. संसारासाठी काटकसर महत्वाची, अशा मानसिकतेच्या कुटुंबात वाढलेल्या श्रद्धाला स्वतःसाठी महागडी साडी घेऊ वाटली नाही. 

मंडळी, इथे श्रद्धाने साडीची किंमत केली की स्वतःची? मला वाटते तिने स्वतःची किंमत केली. तिच्याही नकळत तिच्या मनात हे रुतले होते की अमुक एवढ्या किमतीची साडी आपल्याला परवडणार नाही. ही झाली एका मामुली साडीची गोष्ट! 

पण, थोडे खोलात जाऊन विचार केल्यास कळेल की अशा कितीतरी गोष्टींवर आपण स्वतःहूनच लेबल लावून दिलेले असते हे आपल्याला परवडणारे नाही किंवा अमुक एक गोष्ट आपल्याला मिळणार नाही. मग ती दुकानातील साडी असो की एखाद्या नामवंत विद्यापीठातील अॅडमिशन किंवा विमानाचे तिकीट. प्रत्येकासाठी ही यादी वेगवेगळी असू शकते. 
Image Source : Google



खरे तर अमुक एक गोष्ट आपल्याला परवडणार नाही असा जेव्हा विचार करतो तेव्हा याचा व्यत्यास असा असतो की, आपण अमुक एक गोष्ट मिळवण्याच्या लायकीचे नाही आहोत. ती मुलगी मला कसा होकार देईल? छे छे शक्यच नाही ते! या विचारात तिचा नकार आधीच गृहीत धरून आपण तिच्या लायकीचे नाहीत हे त्या व्यक्तीने ठरवलेलेच असते. 

मला चांगले मित्र-मैत्रिणी मिळतच नाहीत. माझ्या नशिबातच नव्हती ती रेड कलरची लांबोरगिनी. अशी वाक्ये जेव्हा आपण आपल्या मनात घोळवत असतो तेव्हा नकळतपणे आपण आपल्या मनाला हेच बजावत असतो की तुझी लायकी नाही चांगले मित्र-मैत्रिणी मिळवण्याची. तुझी लायकी नाही ती रेड कलरची लांबोरगिनी घेण्याची. 

आपल्याला चांगल्या वस्तू, चांगले मित्र, चांगली जीवनशैली मिळेल की नाही मिळणार हा खूप नंतरचा प्रश्न आहे. पण, तुम्ही जर वारंवार स्वतःला हेच सांगत असाल की मला ते मिळणारच नाही, मला ते परवडणारच नाही, माझ्या हातून हे होणारच नाही. एवढी चांगली नोकरी मिळण्याची माझी पात्रता तरी आहे का? अशी वाक्य आपण बऱ्याचदा स्वतःला आणि इतरांनाहे ऐकवत असतो. 

असे नकारात्मक विचार जेव्हा तुमच्या मनात घोळू लागतात तेव्हा नक्कीच मन उदास होते. म्हणून आधी स्वतःबद्दलची ही मते बदलली पाहिजेत. 

जगात जे काही चांगले आहे त्यासाठी मी पात्र आहे. मला चांगल्या, उत्तम गोष्टी मिळायला हव्यात. मी यासाठी पात्र आहे. सध्या माझ्याकडे ती लांबोरगिनी नसली तरी भविष्यात ती माझाकडे नक्की असणार. मला हव्या त्या युनिव्हर्सिटीमध्ये मला प्रवेश मिळण्यास मी पात्र आहे, त्यासाठी अभ्यास करण्याचीही माझी तयारी आहे. मी हे करू शकतो. अशाप्रकारची वाक्यं जेव्हा तुम्ही स्वतःला ऐकवाल तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमची क्रियाशीलता वाढेल. नकारात्मक विचारांचे मळभ दूर होईल. 

कोणतीही गोष्ट करण्यासाठी बाहेरुन कुणी प्रोत्साहित करण्याची गरजच उरणार नाही. तुम्ही स्वतःच तुमची प्रेरणा बनता. म्हणून मोठे स्वप्न पाहताना आधी स्वतःला हे पटवून द्या की तुम्ही हे स्वप्न पाहण्यास पात्र आहात. तरच तुम्ही ते साध्य करण्यास सक्षम व्हाल. 


जेव्हा स्वतःचे मूल्य स्वतःला पटवून द्याल तेव्हा नक्कीच तुमच्या मनस्थितीत फरक पडेल. सकारात्मकता वाढेल आणि कार्यक्षमतेतही आश्चर्यकारक परिणाम दिसून येईल.

Comments

Popular posts from this blog

नात्यातील Red flags म्हणजे काय? Red flags कसे ओळखायचे? Red flags असणारे नाते टिकवायचे का?

भूतकाळाच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका कशी कराल?

किस करण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत?/Benefits Of Kissing